मुंबई, दि. 28 : प्रजासत्ताक दिनी नवी दिल्ली येथील संचलनात महाराष्ट्र नॅशनल कॅडेट कॉर्प्स (एनसीसी) संचालनालयाने सात वर्षानंतर मोठ्या फरकाने प्रतिष्ठेच्या ‘प्रधानमंत्री ध्वज’ चे विजेतेपद पटकावून देशातील सर्वोत्तम संचालनालयाचा बहुमान प्राप्त करून दिला. महाराष्ट्राच्या एनसीसी पथकातील छात्रसैनिक आणि अधिकाऱ्यांनी घेतलेल्या कठोर परिश्रमामुळे हे यश शक्य झाले असल्याचे, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी सांगितले.
मंत्री श्री. केदार यांच्या शासकीय निवासस्थानी महाराष्ट्राच्या एनसीसी पथकातील छात्रसैनिक आणि अधिकाऱ्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते. यावेळी मेजर जनरल वाय पी खटूरी, ब्रिगेडीअर श्री. लाहीरी व अन्य अधिकारी उपस्थित होते.
मंत्री श्री. केदार म्हणाले, महाराष्ट्र नॅशनल कॅडेट कॉर्प्स (एनसीसी) पथकातील छात्रसैनिकांनी नेत्रदिपक यश प्राप्त केले आहे. महाराष्ट्र एनसीसी संचालनालयाला यापूर्वी एकूण 17 वेळा प्रधानमंत्री ध्वजाचा बहुमान मिळाला आहे. मात्र, गेल्या सात वर्षांपासून महाराष्ट्र उपविजेता किंवा पहिल्या तीन क्रमांकात असायचा. मागील वर्षी महाराष्ट्र हा प्रधानमंत्री ध्वजाचा उपविजेता ठरला होता. तर राज्याला तब्बल सात वर्षांनी हा प्रधानमंत्री ध्वजाचा बहुमान मिळाल्याने या बहुमानाचे विशेष महत्त्व आहे. भविष्यात पुन्हा अशीच कामगिरी करावी यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.
एनसीसीच्या वायुदलाच्या (सिनीयर विंग) बेस्ट कॅडेट्सचा बहुमान पटकाविणारी महाराष्ट्राची कॅडेट वॉरंट ऑफिसर पृथ्वी पाटील हिचा मंत्री श्री. केदार यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. एनसीसी वायुदलाच्या बेस्ट कॅडेटसाठी देशातील कॅडेट्समध्ये चुरस होती. लेखी परिक्षा, समूह चर्चा आणि एनसीसी महासंचालकांसमोर प्रत्यक्ष मुलाखत व शिबिरातील परेड या निकषांवर बेस्ट कॅडेट्ची निवड करण्यात येत असल्याने मंत्री श्री. केदार यांनी त्यांचे विशेष कौतुक केले.
पथकातील विजेत्या सर्व छात्रसैनिकांचा यावेळी मंत्री श्री. केदार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मेजर जनरल वाय पी खटूरी यांनी महाराष्ट्र नॅशनल कॅडेट कॉर्प्स (एनसीसी) संचालनालयाने घेतलेल्या परिश्रमाबाबत माहिती दिली. तसेच शासनाच्या संबंधित सर्व विभागांनी वेळेत सहकार्य केल्याने आम्हाला हे यश मिळविणे शक्य झाले असल्याचे सांगून आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रेया देसाई हिने केले.
0000
from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/zOtweGko5
https://ift.tt/1YSMnre0B
No comments:
Post a Comment