ठाणे ; राज्यातील 15 महापालिकांसाठी एप्रिलमध्ये निवडणूक होणार असल्याचे संकेत मिळाले असल्याने 10 महापालिकांवर मार्चपासून प्रशासक नियुक्ती होऊ शकते. तसेच राज्यातील 24 जिल्हा परिषदांच्या मुदतीदेखील 20 मार्चपर्यंत संपणार आहेत. त्या निवडणुकादेखील एप्रिलमध्ये लागू शकतात. त्यामुळे तेथेही प्रशासकीय राजवट येऊ शकते.
कोरोनाच्या तिसर्या लाटेमुळे नवीन प्रभाग रचनेचे काम मुदतीत पूर्ण होऊ शकलेले नाही. चार ऐवजी तीन प्रभागांची नवीन रचना तयार करण्यात आल्याने पुन्हा प्रभागांची रचना, सीमांकन निश्चित करावे लागले.
त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने शनिवारी प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा जाहीर करून हरकती, सूचना आणि त्यावर सुनावणी घेऊन ती प्रक्रिया 2 मार्चपर्यंत पूर्ण करण्याची सूचना केली आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यात मतदान होण्याची शक्यता असल्याने महापालिकेची निवडणूक मुदतीत होत नसल्याने प्रशासक नियुक्त केले जाईल.
यापूर्वी कोरोना महामारीमुळे नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, वसई-विरार, कोल्हापूर, औरंगाबाद या महापालिकांवर प्रशासकीय राजवट सुरू आहे. आता मार्च आणि एप्रिलमध्ये मुदत संपणार्या ठाणे, मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर, सोलापूर, अकोला, अमरावती, नाशिक, उल्हासनगर महापालिकांवर प्रशासकीय राजवट लागू होणार आहे. याबाबत राज्य सरकारकडून प्रशासक नियुक्तीबाबत अध्यादेश निघेल. बहुतेक विद्यमान आयुक्त हेच त्या त्या महापालिकांचे प्रशासक म्हणून काम पाहतील.
कोरोना महामारीत मार्च 2020 मध्ये पहिले लॉकडाऊन सुरू झाल्यावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना ब्रेक लागला. त्याचा फटका नवी मुंबई, औरंगाबाद, वसई-विरार, कल्याण-डोंबिवली आणि कोल्हापूर महापालिकांना बसला. तेथे सध्या प्रशासकीय राजवट आहे. आता तिसर्या लाटेमुळे मार्च, एप्रिलमध्ये मुदत संपणार्या ठाणे, मुंबई, पुणे, नागपूरसह राज्यातील 10 महापालिकांवर प्रशाकीय राजवट येेणार आहे. अंबरनाथ, बदलापूरसह अन्य नगरपालिकांवर प्रशासकीय राजवट आहे.
ठाणे महापालिकेवर 36 वर्षांनंतर प्रशासक
ठाणे महापालिकेच्या महापौरपदाची कारकीर्द 3 मार्च 2022 रोजी संपणार आहे. तत्पूर्वी महापालिकेची निवडणूक होऊन नवीन महापौर विराजमान होणे अपेक्षित आहे. परंतु ठाणे महापालिकेची निवडणूक मुदतीत होण्याची शक्यता मावळल्याने 4 मार्चपासून म्हणजे तब्बल 36 वर्षांनंतर ठाणे महापालिकेवर प्रशासक नियुक्त होईल आणि विद्यमान आयुक्त डॉ. बिपीन शर्मा हे तिसरे प्रशासक म्हणून ठाणे महापालिकेचा कारभार सांभाळतील. ठाणे महापालिकेची स्थापना झाल्यावर एस. एस. सोहना हे 1 ऑक्टोबर 1982 ते 25 जून 1984 पर्यंत प्रशासक म्हणून काम पाहात होते.
त्यानंतर गोविंद स्वरूप हे प्रशासक म्हणून ठाणे महापालिकेचा कारभार सांभाळू लागले. 26 जून 1984 ते 3 डिसेंबर 1986 पर्यंत ते ठाणे महापालिकेचा कारभार सांभाळत होते. त्यांच्याच काळात महापालिकेची पहिली निवडणूक झाली आणि 21 मार्च 1986 मध्ये शिवसेनेचे सतीश प्रधान हे पहिले महापौर बनले. तेव्हापासून तब्बल 36 वर्षे लोकप्रतिनिधी लोकशाही पद्धतीने महापालिकेचा कारभार हाकत आहेत.
राज्यात 34 जिल्हा परिषदा असून भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषदांवर याआधीच प्रशासकीय राजवट लागू आहे. आता 20 मार्च पर्यंत राज्यातील 24 झेडपींची मुदत संपणार आहे. त्यामध्ये रायगड, कोल्हापूर, सातारा, पुणे, सिंधुदुर्ग, सोलापूर, रत्नागिरी, जळगाव, सांगली, नाशिक,जालना, बीड, गडचिरोली, बुलढाणा, नांदेड, वर्धा, लातूर, परभणी, अहमदनगर, यवतमाळ, हिंगोळी, उस्मानाबाद, औरंगाबाद, अमरावती या झेडपींचा समावेश आहे. या जिल्हा परिषदांच्याही निवडणुका मुदतीत होणार नसल्याने त्यांच्यावर प्रशासकीय राजवट लागू होईल.
No comments:
Post a Comment