कृषि पणन मंडळाच्या नव्या स्वरुपातील मोबाईल अ‌ॅपचे पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते उद्घाटन - latur saptrang

Breaking

Sunday, January 30, 2022

कृषि पणन मंडळाच्या नव्या स्वरुपातील मोबाईल अ‌ॅपचे पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

पुणे दि.२९- सहकार व पणनमंत्री बाळासाहेब  पाटील यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाच्या नव्या स्वरुपातील मोबाईल अॅपचे उद्घाटन करण्यात आले.

कार्यक्रमास  आमदार व महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ सभापती दिलीप मोहिते,  सहकार आयुक्त व निबंधक सहकारी  संस्था अनिल कवडे  पणन संचालक तथा कार्यकारी संचालक महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ सुनिल पवार,  महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाचे  सरव्यवस्थापक दिपक शिंदे, नाबार्ड  व डी. एम. आयचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

मोबाईल अॅपमुळे शेतकऱ्यांना शेतमालाचे बाजारभाव घरबसल्या उपलब्ध होणार आहेत. शेतमालाचे बाजारभाव व कृषि पणनविषयक माहिती उपलब्ध असलेल्या या मोबाईल अॅपचा शेतकरी बांधवांनी मोठ्या प्रमाणावर वापर करावा असे आवाहन मंत्री श्री.पाटील यांनी यावेळी केले.

सध्या मोबईलचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असून आवश्यक माहिती एसएमएस अथवा अॅपद्वारे सहज उपलब्ध होत आहे. शेतकरीदेखील  मोठ्या प्रमाणावर मोबाईलचा वापर करत आहेत. कृषि पणन मंडळ राबवित असलेले विविध प्रकल्प, योजना व उपक्रम तसेच बाजारभाव याबाबत माहिती शेतकरी, बाजार समित्या, बाजार घटक व सर्वसामान्यांना सहजरित्या उपलब्ध करुन देण्यासाठी  कृषि पणन मंडळाने मोबाईल अॅप अद्ययावत केले आहे.

या अॅपद्वारे कृषि पणन मंडळाच्या माहिती व्यतिरीक्त राज्यातील व इतर राज्यातील बाजार समित्यांमध्ये होणारी शेतमालाची  दैनिक आवक व बाजारभाव, शेतकरी उत्पादक कंपन्यांची माहिती,  बाजार समित्यांची संक्षिप्त माहिती, कृषि पणन मित्र मासिक, फलोत्पादन निर्यात प्रशिक्षण,  सुगी पश्चात तंत्रज्ञान  संस्था आदी माहिती उपलब्ध आहे. राज्यातील सर्व बाजार समित्यांना त्यांच्या आवारात आवक होणाऱ्या शेतमालाची दैनिक आवक व बाजारभाव याबाबत माहिती कृषि पणन मंडळाच्या अॅपद्वारे सहजरित्या भरता येणार आहे. यामुळे राज्यातील सर्व बाजार समित्यांमधील बाजारभावाची माहिती एकत्रित करणे सोईचे होणार आहे. शेतमालाची थेट विक्री अथवा खरेदी करण्यासाठी विक्रेता व त्याचा शेतमाल आणि  खरेदीदार व त्याचा शेतमाल याबाबत माहिती प्रसिद्ध करण्याची  सुविधा या  अॅपद्वारे उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाचे मोबाईल अॅप गुगल प्ले स्टोअर व अॅप स्टोअरवर एमएसएएमबी (MSAMB) या नावाने मराठी व इंग्रजी या दोन भाषांमध्ये  विनामूल्य उपलब्ध आहे.

अॅपमुळे  मोबाईलद्वारे शेतमालाची दैनिक आवक व बाजारभाव,  शेतकरी उत्पादक कंपन्या,कृषि पणन मित्र मासिक, राज्यातील सर्व बाजार समित्यांची संक्षिप्त माहिती,शेतमाल विक्रेता व खरेदीदार, कृषि पणन मंडळ राबवित असलेले विविध प्रकल्प, योजना व उपक्रमाची माहिती सहजरित्या मिळेल अशी माहिती पणन संचालक श्री.पवार यांनी दिली.



from वृत्त विशेष – महासंवाद https://bit.ly/3g8f1NW
https://bit.ly/3GblJNq

No comments:

Post a Comment