नवी दिल्ली : देशात करोनावरील लसीकरण मोहीम सुरू आहे. या लसीकरण मोहीमेत ३ जानेवारीपासून १५ ते १७ वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू झाले आहे. यामुलांना कोवॅक्सिन लस देण्यात येत आहे. तसंच आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाइन वर्कर्स आणि ज्येष्ठ नागरिकांना प्रिकॉशन डोस म्हणजे तिसरा डोस दिला जात आहे. आता १२ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांनाही मार्चपासून करोनावरील लस दिली जाईल, असं सांगण्यात येत होतं. पण आता अशी कुठलीही योजना नसल्याचं केंद्रातील सरकारी सूत्रांनी म्हटलं आहे. एएनआयने हे वृत्त दिलं आहे.
लवकरच १२ ते १४ वर्षांच्या मुलांनाही करोनावरील ही लस मिळणार आहे. येत्या मार्चपासून १२ त १४ वर्षे वयोगटातील मुलांना करोनावरील लस दिली जाईल, अशी माहिती NTAGI ग्रुपचे प्रमुख डॉ. एन. के. अरोरा यांनी दिली होती. पण केंद्र सरकारमधील सूत्रांनी हे वृत्त फेटाळून लावलं आहे. १२ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांना करोनावरील लस देण्याबाबत अद्याप कुठलाही निर्णय झाला नसल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील अधिकृत सूत्रांनी सांगितलं आहे.
दुसरीकडे, करोनावरील लसीकरण मोहीमेत देशात गेल्या २४ तासांत ८० लाखांहून अधिक लसींचे डोस दिले गेले. देशात आतपर्यंत एकूण १५८.४ कोटी करोनाचे डोस देण्यात आले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
देशात करोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. गेल्या २४ तासांत देशात करोनाचे जळपास अडीच लाख नवीन रुग्ण आढळून आले आहेत. देशात २ लाख ३८ हजार ०१८ इतके करोनाचे नवीन रुग्ण समोर आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. गेल्या २४ तासांत देशात करोनाने ३१० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
देशात करोनाचे रुग्ण वाढत असताना त्यातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणावर आहे. गेल्या २४ तासांत देशात १ लाख ५७ हजार ४२१ नागरिक करोनातून मुक्त झाले आहेत. देशात करोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या अजूनही खूप आहे. देशात १७ लाख ३६ हजार ६२८ सक्रिय रुग्ण आहेत. देशातील करोना पॉझिटिव्हीटी दर हा १४.४३ टक्के इतका आहे.
२० हजारांनी कमी झाली करोना रुग्णांची संख्या
गेल्या २४ तासांत आढळून येणाऱ्या देशातील करोनाच्या नवीन रुग्णांची संख्या सोमवारच्या तुलनेत २० हजारांहून कमी झाली. विशेष म्हणजे करोना पॉझिटिव्हीटी दर हा १६ टक्क्यांवरून १४ टक्क्यांवर आला आहे. दुसरीकडे ओमिक्रॉनच्या रुग्णांची देशातील एकूण संख्या ही ८ हजार ८९१ इतकी झाली आहे. ओमिक्रॉनची रुग्णसंख्या कालच्या तुलनेत ८.३१ टक्क्यांनी वाढली आहे.
No comments:
Post a Comment