पणजी ; : उत्पल पर्रीकर यांच्या उमेदवारीविषयी भाजप जर घराणेशाहीचा मुद्दा आडवा आणत असेल, तर वाळपई-पर्ये आणि पणजी-ताळगावात एका कुटुंबात दिलेल्या उमेदवार्यांना काय म्हणणार आहात? ही काय घराणेशाही नाही का? असा सवाल करीत भाजप राज्यात सत्तेत येत नाही, हे आपण लिहून देतो, असे शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले. (Sanjay Raut)
शिवसेनेच्यावतीने शुक्रवारी विधानसभा निवडणुकीसाठी नऊ उमेदवारांची घोषणा खा. राऊत यांनी केली. याप्रसंगी खासदार अरविंद सावंत, मुंबईचे आमदार सुनील शिंदे, सुहास कांदे, गोवा संपर्क प्रमुख जीवन कामत, अमोल किर्तीकर व गोवा राज्य शिवसेना प्रमुख जितेश कामत यांची उपस्थिती होती.
मनोहर पर्रीकर यांच्याविषयी आमचे जरूर राजकीय मतभेद होते, परंतु आम्ही पर्रीकर कुटुंबाचा आदर करतो. उत्पल पर्रीकर यांच्यासाठी कर्तृत्वापेक्षा घराणेशाहीचा मुद्दा भाजप महत्त्वाचा मानत असेल तर ते योग्य नाही. भाजपने उत्तर प्रदेशमध्ये मुलायमसिंग यांच्या सूनबाई अपर्णा यादव यांनाही दिलेली उमेदवारी ही घराणेशाहीच.जर उत्पल यांनी पणजीतून अपक्ष म्हणून निवडणूक लढविली तर आम्ही आमचा पणजीतील उमेदवाराची उमेदवारी मागे घेऊ आणि त्यांना पाठिंबा देऊ. निवडून आल्यानंतर अपक्ष म्हणून कायम राहू, भाजपला पाठिंबा देणार नाही, असे त्यांच्याकडून लिखित घेतले जाईल, असे खासदार राऊत म्हणाले.
Sanjay Raut : आणखी तीन उमेदवार जाहीर होतील
खा. राऊत म्हणाले की, आम्ही ज्यांना उमेदवारी दिली आहे, त्यांना राजकीय पार्श्वभूमी नाही. सर्वसामान्यांतील ते उमेदवार आहेत. शिवेसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वसामान्यांना सत्तेत सामावून घेतले. एकूण बारा जागांवर शिवसेना निवडणूक लढवित असून, राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर पक्षाने युती केली आहे.
काँग्रेसच्या नेत्यांचा युतीला विरोध
काँग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत आणि प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्यासमवेत आपण युतीविषयी बोलणी केली होती. आम्ही त्यांना काँग्रेसने तीस जागा लढवाव्यात आणि दहा जागा शिवसेना-राष्ट्रवादी व गोवा फॉरवर्ड पक्ष वाटून घेतील, असा प्रस्ताव मांडला होता. परंतु त्यांना तो प्रस्ताव योग्य वाटला नाही. युती होऊ शकली नाही, याचे काँग्रेसने आत्मचिंतन करावे.
शिवसेनेने जाहीर केलेले नऊ उमेदवार
पेडणे- सुभाष केरकर, म्हापसा- जितेश कामत, शिवोली- विन्सेंट परेरा, हळदोणा- गोविंद गोवेकर, पणजी- शैलेंद्र वेलिंगकर, पर्ये-गुरुदास गावकर, वाळपई- देविदास गावकर, वास्को- मारुती शिरगावकर, केपे -अॅलेक्स फर्नांडिस.
No comments:
Post a Comment