सुशांतसिंह राजपूतची मॅनेंजर म्हणजेच दिशा सॅलियनची हत्या करण्यात आली असून हत्येपूर्वी तिच्यावर बलात्कार करण्यात आला होता, असा गंभीर आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत केला होता. आता आमदार नितेश राणेंनी ट्विट करून म्हटंलय की, या प्रकरणात सचिन वाझेचा संबंध होता का”, असा प्रश्न उपस्थित केला आहे.
नारायण राणेंनी गंभीर आरोप केल्यानंतर महापौर किशोरी पेडणेकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना पत्र लिहिले आणि आयोगाने पोलिसांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे. यात नितेश राणेंनी ट्विट करून सचिन वाझेंसंदर्भात प्रश्न उपस्थित केले आहेत.
नितेश राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय की, “मालवणी पोलिसांची भूमिका पहिल्या दिवसापासूनच संशयास्पद राहिली आहे. आणि आता त्यांना दिशा सॅलियन प्रकरणात अहवाल सादर करण्याचा आदेश देण्यात आला आहे. दिशासोबत राहणारा आणि ८ तारखेच्या रात्री उपस्थित असणारा रोहित राय पुढे येऊन काहीच का बोलत नाही?”
“मुंबईच्या महापौरांनी महिला आयोग आणि त्यानंतर मालवणी पोलिसांना पत्र लिहून अहवाल सादर करण्यास सांगितलं आहे. याचा अर्थ राज्य सरकारकडून ८ जूनच्या रात्री काहीच झालं नाही असं दाखवण्यासाठी मोठी तयारी सुरु आहे. चला किमान ते आपली कबर खोदत आहेत याचा आनंद आहे. दिशाला ८ तारखेच्या रात्री काळ्या मर्सिडीजमधून तिच्या मालाडच्या घरी नेण्यात आलं. सचिन वाझेकडेही काळी मर्सिडीज आहे जी सध्या तपास यंत्रणांकडे आहे. ही तीच कार आहे का? ९ जूनला त्याला पुन्हा पोलीस खात्यात रुजू करण्यात आलं. संबंध?”, अशा आशयाचं ट्विटदेखील नितेश राणेंनी केलं आहे.
राज्य महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकर म्हणतात…
या प्रकरणावर महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी म्हटलंय की, “मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांचा तक्रार अर्ज महाराष्ट्र राज्य महिला आयोग कार्यालयास प्राप्त झाला आहे. श्रीमती दिशा सॅलियन या सुशांतसिंग राजपूत यांच्या पूर्व व्यवस्थापक होत्या. तिच्या मृत्यूबाबत सीबीआय यंत्रणेमार्फत तपास करण्यात आला आहे. मृत्यूपूर्वी तिच्यावर बलात्कार झाला नसून त्यावेळेस ती गरोदर देखील नव्हती, असे तिच्या शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आले आहे.”
“त्यास तिच्या आईवडिलांनी देखील दुजोरा दिला आहे. असे असतानाही केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिशा सॅलियन हिची बलात्कार करून हत्या झाल्याचा आरोप केला आहे. ही बाब अतिशय दुर्दैवी व वेदनादायक आहे. त्यामुळे मृत्यूनंतरही दिशा सॅलियन यांची बदनामी करणाऱ्याविरुद्ध कारवाई करावी अशी मागणी महापौर किशोरी पेडणेकर यांनी महाराष्ट्र राज्य महिला आगोगाकडे केली आहे. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मालवणी पोलीस स्टेशन यांना ४८ तासांमध्ये याचा अहवाल सादर करण्याचे आदेश महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून देण्यात आले आहेत”, असंही रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे.
No comments:
Post a Comment