nawab malik : ईडीच्या तपासाची चक्रे कशी फिरली, कुठल्या कारणांमुळे मलिकांना झाली अटक? बघा... - latur saptrang

Breaking

Wednesday, February 23, 2022

nawab malik : ईडीच्या तपासाची चक्रे कशी फिरली, कुठल्या कारणांमुळे मलिकांना झाली अटक? बघा...



 मुंबई : महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक ( nawab malik news ) यांना आठ तासांच्या चौकशीनंतर ईडीने अटक केली आहे. कुर्ल्यातील जमिनीसंदर्भात नवाब मलिक यांची चौकशी केली जात होती, असे सूत्रांचे म्हणणे आहे. ही जमीन त्यांनी अनेक वर्षांपूर्वी अंडरवर्ल्डच्या लोकांकडून कवडीमोल दरात विकत घेतली होती, असे सांगण्यात येते. याशिवाय दाऊद इब्राहिम मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी मलिक यांची चौकशी करण्यात आली. काय आहे नवाब मलिकांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन? ते जाणून घेऊया.

    टाडा आरोपींची जमीन

    नवाब मलिक यांनी १९९३ बॉम्बस्फोटातील दोन आरोपींकडून कुर्ला परिसरात सुमारे तीन एकर जमीन खरेदी केली होती, असे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काही महिन्यांपूर्वी पत्रकार परिषदेत सांगितले होते. ही जमीन नवाब मलिक यांनी आरोपींकडून कवडीमोल भावात खरेदी केली होती. त्यावेळी या दोन्ही आरोपींवर टाडा अंतर्गत खटला चालवला जात असल्याचे फडणवीसांनी सांगितले. टाडाच्या आरोपींच्या जमिनी सरकार ताब्यात घेते, असा कायदा त्यावेळी होता. त्यामुळे ही जमीन सरकारी ताब्यात जाण्यापासून वाचवण्यासाठी नवाब मलिक यांनी खरेदी केली होती का?, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

    अंडरवर्ल्ड आणि नवाब मलिक

    नवाब मलिक आणि अंडरवर्ल्डचे कनेक्शन खूप जुने असून त्यात दोन पात्र आहेत. यातील पहिले पात्र सरदार शाह वली खान आहे. ज्याच्यावर १९९३ च्या बॉम्बस्फोटाचा आरोप आहे. तो सध्या जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. सरदारवर टायगर मेमनच्या सांगण्यावरून बीएमसी इमारत आणि इतर ठिकाणी बॉम्ब ठेवल्याचा आरोप आहे. याशिवाय टायगर मेमन ज्या अल हुसैनी इमारतीत राहत होता. तिथे कारमध्ये स्फोटके भरण्याचे काम सरदार नावाच्या व्यक्तीने केले होते, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.


    यातील दुसरे पात्र म्हणजे 'मोहम्मद सलीम पटेल'. सलीम पटेल हा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा माणूस आहे. तो दाऊदची बहीण हसिना पारकर हिचा बॉडीगार्ड आणि ड्रायव्हरही होता. हसीनाला अटक झाली तेव्हा पटेललाही मुंबई पोलिसांनी पकडले होते, असे फडणवीस म्हणाले होते. हसीनाच्या नावावर मुंबईत मालमत्ता जमा करण्यात आली होती आणि हे सर्व सलीम पटेलच्या नावावर होते. म्हणजेच पॉवर ऑफ अॅटर्नी सलीम पटेल यांच्या नावावर होती, असे इंटेलिजन्स ब्युरोच्या अहवालात म्हटले आहे.

    तिसरे पात्र छोटा शकील

    अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे हवाला रॅकेट हाताळण्याची जबाबदारी छोटा शकीलवर आहे. मुंबईत शकील हा हवाला रॅकेट आपल्या खास गुंडांच्या माध्यमातून चालवतो. मुंबईत छोटा शकीलचा नातेवाईक सलीम फ्रूट याला ईडीने ताब्यात घेतले होते. इथूनच या प्रकरणाला सुरवात झाली. मुंबईतील दाऊदची बहीण हसिना पारकर हिच्या हवाला रॅकेटवर सलीम फ्रुट्स देखरेख करत असे. २०१४ मध्ये हसीना पारकरचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. तेव्हापासून तो पारकर आणि दाऊद टोळीचा कारभार पाहत होता.



    गेल्या आठवड्यात ईडीने मंगळवारी मुंबईत अनेक ठिकाणी छापे टाकले होते. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसिना पारकर हिच्या घरावर, तिच्याशी संबंधित मालमत्ता आणि लोकांवर मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली छापा टाकण्यात आला. ईडी काही काळापासून अंडरवर्ल्ड माफियांविरुद्ध मनी लाँड्रिंग प्रकरणांची चौकशी करत होती. यादरम्यान काही राजकीय व्यक्तींचा अंडरवर्ल्ड डॉनशी संबंध असल्याचेही समोर आले आहे.


    चौथे पात्र म्हणजे इक्बाल कासकर

    इक्बाल कासकर याला ईडीने काही दिवसांपूर्वी मनी लाँड्रिंग प्रकरणी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. सलीम फ्रूटने ईडीच्या चौकशीत इक्बाल कासकरचे नाव घेतले होते. इक्बाल कासकरने चौकशीत नवाब मलिकांचे नाव घेतले होते, असे सूत्रांनी सांगितले. त्यानंतर ईडीने दीर्घ चौकशीनंतर नवाब मलिकांना अटक केली.

    No comments:

    Post a Comment