नवी दिल्ली : रशियाने युक्रेनवर हल्ला सुरू केला आहे. युद्धकाळातील ( russia ukraine war ) सायरनचे आवाज धडकी भरवत आहेत. टीव्ही चॅनेल्सच्या माध्यमातून भारतातील घराघरात हे आवाज ऐकू येत आहेत. युक्रेनच्या आकाशात धूर आणि धुराचे लोट पाहून ज्या भारतीय कुटुंबांची मुले-मुली तिथे अडकली आहेत, ती घाबरली आहेत. युक्रेनमध्ये अजूनही १८,००० हून अधिक भारतीय असल्याचे सांगण्यात येत आहे. युक्रेनमधून भारतीयांना एअरलिफ्ट करण्यासाठी ७२ तासांपूर्वी ऑपरेशन सुरू केले. पण हल्ला सुरू झाल्यानंतर ते थांबवावे लागले आहे. युक्रेनला निघालेले एअर इंडियाचे विमान दिल्लीला परतत असल्याची बातमी आज सकाळी आली.
कीवमधील भारतीय मिशनने काही दिवसांपूर्वीच भारतीय नागरिकांसाठी अॅडव्हायझरी जारी करण्यास सुरवात केली होती. मात्र, अजूनही भारतीय तिथेच अडकले आहेत. हवाई मार्गाने नवी दिल्लीहून युक्रेनला जाणारी विमाने पाकिस्तान, इराणच्या आकाशातून जातात.
रशिया-युक्रेन यांच्यात युद्ध सुरू झाल्यानंतर भारत सरकारचे प्राधान्य आपल्या नागरिकांना सुरक्षितपणे मायदेशात आणण्याचे आहे. हवाई क्षेत्र बंद केल्यानंतर भारत आपल्या नागरिकांना बाहेर काढण्याच्या पर्यायांवर विचार करत आहे. भारतीय दुतावास नवी दिल्लीशी सतत संपर्कात आहे.
एअर इंडियाच्या विमानाला नवी दिल्लीहून कीवच्या बोरिसपिल आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरण्यासाठी ८ तास लागले. युक्रेनमधून भारतीयांना आणण्यासाठी आणखी उड्डाणे चालवता येतील. पण आता युद्ध सुरू झाल्यानंतर परिस्थिती बदलली आहे, असे परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी बुधवारी सांगितले होते. कीवमध्ये परिस्थिती आणखी बिघडल्यास बॉम्बस्फोटामुळे कमी प्रभावित झालेल्या भागात विमान उतरवून नागरिकांना विमानातून नेले जाऊ शकते. दुसरा पर्याय म्हणजे जवळच्या देशात विमान उतरवणे. जर युद्ध वाढले आणि काही दिवसांत परिस्थिती सुधारली नाही, तर भारत शेजारील मोल्दोव्हा या युक्रेनला लागून असलेल्या देशातून किंवा बॉम्ब हल्ले होत नसलेल्या ठिकाणी भारतीयांना गोळा करू शकतो. मात्र, हा निर्णय सरकारच्या पातळीवर घ्यावा लागेल आणि त्यासंदर्भात दिल्लीत चर्चा सुरू झाल्याची अपेक्षा आहे.
सध्या अडकलेल्या भारतीयांना बंकरमध्ये नेण्यात आले आहे. आपला मुलगा युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेतोय. नवी दिल्लीला जाण्यासाठी २६ फेब्रुवारीला त्यांचे विमान होते, उत्तराखंडमधील टिहरी येथील एका व्यक्तीने सांगितले. आता विमान येणार की नाही? याबाबत कुटुंबीय धास्तावले आहेत. येत्या काही दिवसांत परिस्थिती स्पष्ट होऊ शकते. युद्धविराम दरम्यान विदेशी नागरिकांना बाहेर काढण्याचा पर्याय देखील आहे. रशियाने आंतरराष्ट्रीय दबावाखाली काही काळ हल्ला थांबवला तर भारतासह जगभरातील देश निर्धारित कालावधीत आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी विशेष उड्डाणे चालवू शकतात. असं असलं तरी आपण नागरिकांना लक्ष्य करत नसल्याचा दावा रशियाने केला आहे.
No comments:
Post a Comment