उदगीर येथे होणारे 95 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
लातूर जिल्ह्याचा लौकिक वाढविणारे, सर्वांच्या सहकार्याने यशस्वी करु या
लातूर,दि. 12(जिमाका):- 95 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उदगीर येथे होत आहे. हे साहित्य संमेलन लातूर जिल्ह्याचा लौकिक वाढविणारे असल्यामुळे सर्वांच्या सहकार्याने साहित्य संमेलन यशस्वी करु असे प्रतिपादन राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले. साहित्य संमेलनाच्या नियोजनाच्या सहकार्यासाठी जिल्ह्यातील शासकीय अधिकाऱ्यांबरोबर आयोजित बैठकीत ते बोलत होते.
या बैठकीस जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, महाराष्ट्र एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष तथा साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष बस्वराज पाटील नागराळकर, महाराष्ट्र एज्युकेशन संस्थेचे उपाध्यक्ष राम तिरुके विविध विभागाचे अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.
या बैठकीत साहित्य संमेलनासाठी सुरक्षा, उदगीर शहराला जोडणारे रस्ते तसेच स्वच्छता, पाणीपुरवठा, विद्युत, शहर सुशोभिकरण या बाबीवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी सर्व संबंधित शासकीय विभागाच्या अधिकाऱ्यांना साहित्य संमेलनाच्या अनुषंगाने करावयाचे कामं तात्काळ करावीत. जिथे काही समस्या असतील त्याच्या सोडवणुकीसाठी आपल्याकडे संपर्क करावा.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील संबंधित विभागाला साहित्य संमेलनास सहकार्य करण्यास सांगितले.
संमेलनाचे कार्याध्यक्ष बस्वराज पाटील नागराळ यांनी साहित्य संमेलनासाठी जिल्हा प्रशासनाकडून कोण -कोणत्या गोष्टींची मदत आवश्यक आहे, याबाबत सविस्तर माहिती दिली.
साहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी प्रशासनामधील सर्व विभाग सहकार्य करतील, असे त्या-त्या विभागाच्या अधिकाऱ्यांनी या बैठकीत सांगितले.
संमेलनाचे मुख्य समन्वयक दिनेश सास्तूरकर, समन्वयक रमेश अंबरखाने, प्रा. आर.आर. तांबोळी, उपप्राचार्य आर.के. मस्के, कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती सिध्देश्वर पाटील, जळकोटचे नगर पंचायतीचे उपाध्यक्ष मन्मथअप्पा किडे इत्यादी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment