महाराष्ट्रात असं वातावरण कधीच पाहिलं नव्हतं : शरद पवार
“प्रत्येकाने आपल्या धार्मिक भावना स्वतःपर्यंत मर्यादित ठेवाव्यात. धर्माबद्दल असलेल्या भावनांची प्रदर्शन नको. महाराष्ट्रात असं वातावरण कधीच पाहिलं नव्हतं. धर्मांमध्ये तेढ निर्माण केली जात आहे. मुख्यमंत्र्यांवर खालच्या पातळीवर होणारी टीका अशोभनीय आहे. सत्ता गेल्यानंतर लोक अस्वस्थ होतात. पण, सत्ता येत जात असते”, असे मत राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी आज व्यक्त केले.
शरद पवार पुण्यात प्रसार माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले की, “मी राज्यात अनेक वर्ष काम केलं. बाळासाहेब ठाकरे आणि आमचे इतके जाहीर मतभेद असायचे की एकमेकांबद्दल शब्द वापरताना आम्ही कधी काटकसर केली नाही. पण ही बैठक संपल्यानंतर संध्याकाळी आम्ही एकमेकांच्या घऱी असायचो. अनेक वेळा औरंगाबादला सभेत आम्ही विरोधकांवर तुटून पडायचो. पण ती सभा संपल्यानंतर त्यावेळच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत आमची संध्याकाळ जायची.सभेत काय बोललो याचं स्मरणही कधी व्हायचं नाही, यशवंतराव चव्हाण यांच्यापासून ही परंपरा सुरु होती.”
“महाराष्ट्राच्या विधीमंडळात अनेकदा यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री असताना विरोधकांसोबत टोकाची चर्चा व्हायची. पण चर्चा संपल्यानंतर एकत्र बसून राज्याच्या हिताचा विचार करायचे. ही महाराष्ट्राची परंपरा आहे. पण दुर्दैवाने अलीकडे नको त्या गोष्टी पहायला मिळत आहेत. मुख्यमंत्र्यांवर धोरणात्मक टीका करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. पण त्यांचं एकेरी नाव घेत वेडंवाकडं बोलणं शोभत नाही. मुख्यमंत्री म्हणजे एक संस्था आहे. त्याचा आदर ठेवला पाहिजे, पण ते न ठेवण्याची भूमिका काहीजण घेतात”, असेही शरद पवार यांनी म्हटलं आहे.“तुम्हाला धार्मिक कार्यक्रम करायचा असेल तर तुमच्या घरी करु शकता. पण माझ्या दारात येऊन करतो म्हटल्यावर त्यामुळे माझ्याबद्दल आस्था असणाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली तर दोष देता येणार नाही. अलीकडे या पद्धतीची भूमिका काहीजण मांडत आहे. पण लवकरच हे सर्व शांत होईल अशी आशा करुयात. आम्हा लोकांची भूमिका मतभेद कसा वाढणार नाही आणि राज्याची जुनी परंपरा आहे ती कशी कायम राहील याची काळजी घेण्याचा प्रयत्न असेल”, असेही शरद पवार यांनी माध्यमांना सांगितले.
No comments:
Post a Comment