श्रीलंकेत आणीबाणी जाहीर, राष्ट्रपतींकडून घोषणा - latur saptrang

Breaking

Saturday, April 2, 2022

श्रीलंकेत आणीबाणी जाहीर, राष्ट्रपतींकडून घोषणा



 कोलंबो; 

श्रीलंकेतील परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. शुक्रवारीदेखील श्रीलंकेच्या राष्ट्रपतींच्या निवासस्थानासमोर लोकांनी जोरदार निदर्शने केली. या पार्श्वभूमीवर श्रीलंकेत आणीबाणी (state of emergency) जाहीर करण्यात आली आहे. श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे (Sri Lanka President Gotabaya Rajapaksa) यांनी १ एप्रिल २०२२ पासून सार्वजनिक आणीबाणी जाहीर करणारे राजपत्र जारी केले आहे, असे वृत्त स्थानिक माध्यमांनी दिले आहे.

राष्ट्रपती गोटबाया यांनी सार्वजनिक सुरक्षा अध्यादेशांतर्गत राजपत्र जारी केले. आणीबाणीच्या नियमांनुसार, राष्ट्रपती ताब्यात घेण्याची प्रक्रिया अधिकृत करू शकतात तसेच कोणत्याही मालमत्तेचा ताबा घेऊ शकतात आणि कोणत्याही परिसराची झडती घेऊ शकतात. तो कोणताही कायदा बदलू किंवा त्याला स्थगिती देऊ शकतात.

दरम्यान, वरिष्ठ डीआयजी अजित रोहणा यांनी सांगितले की, पश्चिम प्रांतात मध्यरात्री ते शनिवारी सकाळी ६ वाजेपर्यंत कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. श्रीलंकेची (Sri Lanka economic crisis) अर्थव्यवस्था प्रचंड आर्थिक समस्यांचा सामना करत आहे. जीवनाश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. या पार्श्वभूमीवर देशातील आर्थिक संकट हाताळण्यात सरकारला अपयश आल्याच्या निषेधार्थ लोक रस्त्यावर उतरत आहेत. राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे यांच्या राजीनाम्याची मागणी करत लोक त्यांच्या निवासस्थानासमोर जोरदार निदर्शने करत आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मुख्य शहर कोलंबोच्या अनेक भागांमध्ये कर्फ्यू लागू केला आहे.

श्रीलंकेच्या आर्थिक विकासाचे (Sri Lanka economic crisis) पूर्ण गणितच कोलमडले आहे. तर दुसरीकडे, श्रीलंकेने गेल्या काही वर्षांमध्ये चीनकडून मोठ्या प्रमाणावर कर्ज घेतले आहे. ही कर्जाची रक्‍कम भरमसाट वाढत गेली. श्रीलंकेवरील कर्ज १६ ते १७ अब्ज डॉलर्स इतके असून, यापैकी १० ते १२ अब्ज डॉलर्स हे एकट्या चीनकडून घेतलेले आहे.

येथे महागाईचा दर १७ टक्क्यांच्या पुढे गेला आहे. १ कप चहाचा दरही १०० रुपयांवर पोहोचलाय. ब्रेडच्या एका पॅकेटसाठी १५० श्रीलंकन ​​रुपये मोजावे लागत आहेत. श्रीलंकेतील महागाई वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे डॉलरच्या तुलनेत श्रीलंकेचा रुपया कमकुवत होणे हे देखील आहे. मार्च महिन्यातच श्रीलंकन ​​रुपयाचे मूल्य डॉलरच्या तुलनेत ४६ टक्क्यांनी घसरले आहे. मार्चमध्येच, १ डॉलरचे मूल्य २०१ श्रीलंकन ​​रुपयांवरून २९५ श्रीलंकन ​​रुपयांपर्यंत वाढले. त्यामुळे श्रीलंकेत महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. श्रीलंकेकडील परकीय चलन साठा जवळजवळ संपुष्टात आला आहे.

No comments:

Post a Comment