महावितरणच्या विद्युत सहायक पदभरतीत समांतर आरक्षण धोरणाची अंमलबजावणी करा; अन्यथा कारवाई – राज्यमंत्री दत्तात्रय भरणे - latur saptrang

Breaking

Tuesday, May 24, 2022

महावितरणच्या विद्युत सहायक पदभरतीत समांतर आरक्षण धोरणाची अंमलबजावणी करा; अन्यथा कारवाई – राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

मुंबई, दि. 24 : महावितरण कंपनीच्या विद्युत सहायक, उपकेंद्र सहायक व पदविकाधारक/ पदविधारक शिकाऊ अभियंता (वितरण/स्थापत्य) या पदांच्या भरती प्रक्रियेत शासन निर्णयानुसार समांतर आरक्षण धोरण राबवावे. या प्रक्रियेत दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध जबाबदारी निश्चित करावी, असे निर्देश सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी अधिकाऱ्यांना दिले.

विद्युत सहायक पदभरतीसंदर्भात प्रतिक्षा यादीमध्ये समांतर आरक्षण लावून सुधारित निवड यादी प्रसिद्ध करण्याबाबत श्री.भरणे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीला सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव सु.ह.आंधळे, महावितरणचे महाव्यवस्थापक भूषण कुलकर्णी, सहायक महाव्यवस्थापक शशिकांत पाटील, कक्ष अधिकारी  पल्लवी पालांडे आदी अधिकारी उपस्थित होते.

राज्यमंत्री श्री.भरणे म्हणाले की, शासन सेवा प्रवेशासाठी सामाजिक आणि समांतर आरक्षणाचे धोरण ठरविण्यात आले आहे. समांतर आरक्षण धोरणानुसार एखाद्या समांतर आरक्षण प्रवर्गातील पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास ते पद त्या-त्या सामाजिक प्रवर्गातील अन्य उमेदवारांकडून गुणवत्तेनुसार भरण्यात येते. त्यामुळे निवड यादीमध्ये पात्र समांतर आरक्षणाचा उमेदवार उपलब्ध न झाल्यास उमेदवार प्रतिक्षा यादीतून भरणे आवश्यक आहे.

महावितरणच्या पदभरतीसंदर्भात उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने राज्यशासनामार्फत ऊर्जा विभागाला एकत्रित शपथपत्र दाखल करण्याबाबत सूचित केले असून त्याप्रमाणे कार्यवाही करण्याचे निर्देश देखील राज्यमंत्री श्री.भरणे यांनी दिले.

००००

पवन राठोड/उपसंपादक/24.5.2022



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/KQVZCDl
https://ift.tt/bS0WpdA

No comments:

Post a Comment