औरंगाबाद शहरात निर्माण झालेल्या पाणी टंचाईवरून भाजपकडून आज भव्य असा 'जल आक्रोश मोर्चा' काढण्यात येणार आहे. तर यावरून एमआयएमचे नेते तथा खासदार इम्तियाज जलील यांनी शिवसेना-भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे.पाण्यासाठी भाजपकडून काढण्यात येणारा मोर्चा म्हणजेच 'ड्रामाबाजी' असल्याचा खोचक टोला जलील यांनी लगावला आहे.
यावेळी बोलताना जलील म्हणाले की, हा जल आक्रोश मोर्चा नाही तर भाजपचा राजकीय मोर्चा आहे.औरंगाबाद शहर फक्त शिवसेनेचा गड नसून तो आमचाही गड असल्याचा दाखवण्यासाठीच भाजप हा मोर्चा काढत आहे. त्यामुळे या दोघांच्या वादात सर्वसामान्याना गाडण्याचं काम केले जात आहे. जर असे मोर्चे काढल्याने शहराला पाणी मिळणार असेल तर मी सुद्धा एक सर्वसामान्य नागरिक म्हणून या मोर्च्यात सहभागी होण्यासाठी तयार आहे. मोर्च्यासाठी लाखो रुपये खर्च करून शहरात ठीक-ठिकाणी बॅनर लावण्यात आले आहे, पण भाजपच्या महिला कार्यकर्त्यांना सुद्धा माहित आहे की, याने काहीही होणार नाही. त्यामुळे लोकांच्या घरा-घरात जाऊन त्यांना हंडे दिले जात असून मोर्च्यात सहभागी होण्यासाठी सांगितले जात आहे. मात्र लोकांनाही माहित आहे की, पाणी मिळणार नाही,असा आरोप जलील यांनी केला आहे.
तर हा प्रामाणिक प्रयत्न असता...
लाखो रुपयांचे बॅनर लावून असे मोर्चे काढल्याने काय होणार. त्यापेक्षा जर फडणवीस यांनी शहरात येऊन आम्हाला बोलवून अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन यावर कसा तोडगा काढला जाईल यासाठी प्रयत्न केले असता तर हा प्रामाणिक प्रयत्न असता. पण फक्त नाटक करण्यासाठी ते येत असून लाखो रुपये होर्डिंगवर खर्च करत आहे. जर हेच पैसे पाणी प्रश्न मिटवण्यासाठी वापरले असते तर तेवढ्या पैश्यांमध्ये अनेक वस्त्यांमधील पाणी ऊपलब्ध करून देता आले असते, असेही जलील म्हणाले.
लोकं मारतील म्हणून पाणी पट्टी कमी केली...
मागील तीस वर्षांपासून महानगरपालिकेत भाजप-शिवसेनेची सत्ता आहे. त्यांच्या याच बहुमतावर त्यांनी सर्वात जास्त पाणी पट्टी वसूल करण्याचा निर्णय घेतला होता. आता म्हणतात आम्ही दोन हजार रुपये कमी करतोय. कशाला करतायत तुमच्यावर तर गुन्हे दाखल केले पाहिजे, लोकांना लुटून खाल्लं आहे तुम्ही असाही आरोप जलील यांनी केला.आज निवडणूक जवळ आली अशावेळी लोकं आपल्याला मारतील म्हणून दोन हजार कमी केले. विशेष म्हणजे त्याचाही शिवसेना गाजावाजा करत असल्याच जलील म्हणाले.
औरंगाबादकर जवाबदार..
औरंगाबाद शहरात पाणी टंचाईची जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्याला जेवढी भाजप-शिवसेना जवाबदार आहे तेवढच औरंगाबादकर सुद्धा जवाबदार आहे. कारण औरंगाबादच्या लोकांनी कधीही पाण्यासाठी मतदान केलं नाही, तर फक्त जातीसाठी,धर्मासाठी,मशीद,मंदिर आणि नामांतरासाठी मतदान केलं असल्याचं जलील म्हणाले.
No comments:
Post a Comment