यूसुफ पठान
मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते 'जैतर' चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण
नाशिकमध्ये चित्रीकरणास अधिक वाव; इगतपुरीतील मुंढेगाव येथे चित्रनगरी साकारण्यास प्रयत्नशील - मंत्री छगन भुजबळ
‘जैतर’ चित्रपट निर्मितीसाठी मोहन घोंगडे यांचे प्रामाणिक प्रयत्न; त्यांचा प्रयत्नांना सर्वांनी साथ द्यावी- मंत्री छगन भुजबळ
नाशिक,दि.२८ मे :- नाशिक शहर व जिल्ह्यात चित्रपटांच्या चित्रीकरणास अधिक वाव असून इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथे चित्रनगरी साकारण्यास आपण प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
मालेगाव तालुक्यातील सोनज येथील तरुण मोहन घोंगडे यांनी निर्मिती केलेल्या ‘जैतर’ या मराठी चित्रपटाच्या पोस्टरचे आज नाशिकच्या महाकवी कालिदास कलामंदिरात अनावरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री डॉ.शोभा बच्छाव, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अॅड.रवींद्र पगार, मालेगाव बाजार समितीचे माजी उपसभापती बंडूकाका चव्हाण, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, चित्रपट महामंडळाचे शाम लोंढे, माजी जिल्हा परिषद सदस्य मनीषा पवार, दिग्दर्शक घनश्याम पवार, निर्माते मोहन घोंगडे, अभिनेता रजद गवळी, अभिनेत्री सायली पाटील, स्मिता प्रभू, राजु शिर्के, विकी खैरनार, संजय वाघ, ज्ञानेश्वर पवार, दिपक हिरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, चित्रपट क्षेत्राबाबत नाशिकला अतिशय जुनी अशी ओळख आहे. नाशिकच्या भूमीतून दादासाहेब फाळके यांनी अतिशय कठीण कालवधीत चित्रपट निर्मितीत आपले पाऊल ठेवलं. त्यानंतर देशाच्या चित्रपटसृष्टीचे नाव जगभरात दादासाहेब फाळके यांच्या माध्यमातून अजरामर झाल. चित्रपट निर्मिती करतांना त्यांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागला. प्रसंगी आपल्या पत्नीचे दागिने देखील त्यांना मोडावे लागले मात्र तरी देखील त्यांनी आपले प्रयत्न सुरु ठेवले. त्यातून त्यांना मोठ यश मिळालं. त्यांच्या या कार्यामुळे देशातील चित्रपट सृष्टीला जगभरात त्यांच्या नावाने ओळख मिळाली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
ते म्हणाले कि, देशात शेतीनंतर सर्वात मोठा उद्योग म्हणून चित्रपट सृष्टीकडे बघितले जाते. प्रसिद्धी मिळविण्यासाठी सिनेमा हे अतिशय प्रभावी माध्यम असून सद्या मराठी चित्रपटाला चांगले दिवस आले असून विविध ऐतिहासिक चित्रपटांची निर्मिती होत आहे. त्याला प्रेक्षकांचा देखील प्रतिसाद लाभला आहे. त्याचबरोबर आज देखील अनेक सिनेमा तयार होऊन देखील थिएटर अभावी प्रदर्शित होऊ शकले नाही असे सांगत मोहन घोंगडे यांनी प्रामाणिकपणे काम करत ‘जैतर’ हा मराठी चित्रपट तयार केला आहे. त्यांनी केलेल्या या प्रामाणिक प्रयत्नांना सर्वांनी साथ द्यावी. शासन स्तरावर देखील आवश्यक ती मदत करण्यासाठी आपण प्रयत्न करू असे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.
ते म्हणाले की, पर्यटन वाढण्यासाठी चित्रपटांची अतिशय महत्वाची भूमिका असून चित्रपटांच्या निर्मितीतून स्थानिक ठिकाणी रोजगार तसेच अर्थकारणाला अधिक गती मिळत असते. त्यामुळे इगतपुरीतील मुंढेगाव येथे चित्रपटनगरी निर्माण करण्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहे. तसेच जास्तीत जास्त चित्रपटांचे शूटिंग नाशिकमध्ये व्हावे यासाठी त्यांना आवश्यक त्या परवानग्या देण्याच्या सूचना आपण जिल्हा प्रशासनाला केलेल्या असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
No comments:
Post a Comment