मुंबई: राज्यसभेची निवडणूक लढवण्यास इच्छूक असलेल्या संभाजीराजे छत्रपती यांनी शिवसेनेने दिलेला प्रस्ताव नाकारला आहे. राज्यसभा निवडणुकीत पाठिंब्यासाठी संभाजीराजे यांना शिवसेनेत प्रवेश करण्याची अट घालण्यात आली होती.संभाजीराजे यांना सोमवारी दुपारी १२ वाजता मातोश्रीवर शिवबंधन बांधण्यासाठी या, असा निरोप देण्यात आला होता. मात्र, राज्यसभा निवडणूक अपक्ष लढण्यावर ठाम असलेल्या संभाजीराजे (Sambhajiraje Chhatrapati) यांनी शिवसेनेचा प्रस्ताव धुडकावून लावला. त्यानंतर संभाजीराजे छत्रपती सोमवारी पहाटेच कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाले. संभाजीराजे यांचे सर्व कार्यकर्तेही कोल्हापूरला परतले आहेत. त्यामुळे मातोश्रीवर आज संभाजीराजे यांच्या शिवबंधनाचा कार्यक्रम पार पडणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.
या सगळ्यानंतर आता मराठा मोर्चा सक्रिय होण्याची चिन्हे आहेत. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढारे यांनी आज दुपारी बैठक बोलावली आहे. या बैठकीत एखादा महत्त्वाचा निर्णय होऊ शकतो. संभाजीराजे छत्रपती हेदेखील मराठा समन्वयकांशी चर्चा करणार असल्याची माहिती आहे. मराठा मोर्चा समन्वयकांनी रविवारी पुण्यात शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यावेळी मराठा मोर्चाने राज्यसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने संभाजीराजे यांना पाठिंबा द्यावा, अशी मागणी केली होती. येत्या १० जून रोजी राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक होत आहे. यापैकी दोन जागांवर भाजप, तर उर्वरित तीन जागांवर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा उमेदवार सहजपणे निवडून येईल. तर सहाव्या जागेवर उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजप आणि महाविकासआघाडी यांच्यापैकी कोणाकडेही पुरेसे संख्याबळ नाही. त्यामुळे याच सहाव्या जागेवर संभाजीराजे छत्रपती यांनी दावा सांगितला आहे. या जागेवर निवडून येण्यासाठी संभाजीराजे छत्रपती यांनी सर्वपक्षीय आमदारांना मदत करण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे आता पुढे काय घडणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
कालच शिवसेना नेत्यांच्या शिष्टमंडळाने ट्रायडंट हॉटेलमध्ये जाऊन संभाजीराजे छत्रपती यांची भेट घेतली होती. या शिष्टमंडळात अनिल देसाई, मिलिंद नार्वेकर आणि उदय सामंत यांचा समावेश होता. या तिन्ही नेत्यांनी संभाजीराजे छत्रपती यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांना मातोश्रीचा निरोप दिला होता. उद्या दुपारी १२ वाजता शिवबंधन बांधायला मातोश्रीवर या, असा निरोप उद्धव ठाकरे यांनी संभाजीराजे यांना पाठवाला होता. मात्र, आता संभाजीराजे यांनी शिवसेनेचा हा प्रस्ताव नाकारल्याचे स्पष्ट झाले आहे.
No comments:
Post a Comment