मुंबई : अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या दीपाली सय्यद (Deepali Sayed) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या आजच्या पुण्यातील सभेवर टीका केली आहे. राज ठाकरे यांनी पुण्यातील सभेचा शेवट करताना आपण मशिदीवरील भोंग्यांविरोधातील आंदोलन थांबवलेलं नाही, असं जाहीर केलं आहे. तर, महाराष्ट्रातील जनतेला देण्यासाठी मनसे कार्यकर्त्यांना एक पत्र देणार असल्याचं राज ठाकरे म्हणाले होते. राज ठाकरेंच्या सभेतील या मुद्यावरुन दीपाली सय्यद यांनी टीका केली आहे.
दीपाली सय्यद नेमकं काय म्हणाल्या?
दीपाली सय्यद यांनी "पत्रक घरोघरी दिल्यानंतर तुम्ही आंदोलन करून जेल मध्ये जाणार आणि अमित ठाकरे लपून बसणार हा शिलेदारांसाठी मोठा ट्रॅप आहे. घाबरलेला भोंगा आज महाराष्ट्राने पाहिला, असं ट्विटमध्ये म्हटलं आहे. राज ठाकरेंच्या भाषणावर टीका करताना दीपाली सय्यद यांनी घाबरलेला भोंगा आज महाराष्ट्रानं पाहिला,असं म्हटलंय.
दीपाली सय्यद भाजप आणि मनसेविरोधात आक्रमक
दीपाली सय्यद यांनी गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि मनसेविरुद्ध भूमिका मांडण्याचं काम सुरु ठेवलं आहे. "सभा रद्द करून कोणताच मुद्दा शेवट पर्यंत मार्गी न लावण्याची परंपरा राज साहेबांनी कायम ठेवली त्याबद्दल खंत आहे. पण पुण्याच्या मेळाव्याला वसंत मोरे यांना खुर्ची मिळेल का हा यांच्या पक्षाचा सर्वात मोठा प्रश्न आहे. अरे खुर्ची द्याल कि नाही!', अशा शब्दात दीपाली सय्यद यांनी काल मनसेवर टीका केली होती.
दौऱ्याला विरोध करणाऱ्यांना महाराष्ट्रातून रसद, राज ठाकरेंचा आरोप
राज ठाकरे यांनी पुण्यातील सभेत बोलताना आजच्या सभेचं मुद्दाम आयोजन करण्याचं कारण म्हणजे अयोध्या दौरा तूर्तास रद्द केल्याचं सांगितल्यानंतर अनेकांना आनंद झाला, अनेकांनी कुत्सितपणे टीका केली. मी त्यांना दोन दिवसांचा वेळ दिला होता, असं म्हटलं. सर्वांचं बोलून झाल्यावर मी माझी भूमिका सर्वांना सांगेन. मी अयोध्येला जाणार असं जाहीर केल्यावर हे प्रकरण सुरु झालं. मग, अयोध्येला येऊ देणार नाही असं प्रकरण सुरु झालं. मला दिल्ली, मुंबई आणि उत्तर प्रदेशातून माहिती मिळाली. हे सर्व काही चाललंय हा सापळा आहे, हे माझ्या लक्षात आलं. आपण त्या सापळ्यात अडकू नये, असं मला वाटलं. या सर्व गोष्टी सुरु झाल्या याची सुरुवात, त्यासाठी रसद महाराष्ट्रातून सुरु झाली, असा आरोप राज ठाकरेंनी केला.
No comments:
Post a Comment