रत्नागिरी: रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार भाजपाचे युवानेते निलेश राणे यांनी दोन ट्विट करत नवाब मलिक आणि डी-गँग संबंध या प्रकरणी थेट राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. तशा आशयाचे ट्विट निलेश राणे यांनी केल आहे.
''दाऊद आणि नवाब मलिक दोघांचे संबंध आहेत हे संबंधित कोर्टाचं निरीक्षण, नवाब मलिकांवर केलेले आरोप खरे ठरले, आतातरी बारामतीचे नेते नवाब मलिकचा राजीनामा घेणार? की अजूनपण दाऊदच्या ग्रीन सिग्नलची वाट बघत आहेत", असा सवाल निलेश राणेंनी उपस्थित केला.
तर, ''पवार साहेब तुमचे डायरेक्ट दाऊद सोबत संबंध नाही ना? नवाब मलिक मधला असू शकतो. राजकारणात जेव्हापासून आलो तेव्हापासून चा हा संशय आहे. कारण, मुंबई बॉम्ब ब्लास्ट घटनेपासून तुम्ही एक वाढीव बॉम्ब ब्लास्ट जाहीर केला तो नेमका कोणाला वाचवण्यासाठी होता? तेव्हा मीडिया वेगळी होती, तुम्ही वाचलात", असं ट्विट करत निलेश राणेंनी शरद पवारांवर गंभीर आरोप केलाय.
नवाब मलिकांच्या सरदार खानसोबत बैठका, ईडीचा दावा
मनी लाँड्रिंग प्रकरणात अटकेत असलेले मंत्री नवाब मलिक यांनी कुर्ल्यातील मालमत्तेच्या प्रकरणी दाऊद इब्राहिम आणि १९९३ च्या बॉम्बस्फोट खटल्यातील दोषी असलेल्या सरदार खानसोबत बैठका केल्याचा दावा एन्फोर्समेंट डिरेक्टोरेटने (ED) विशेष न्यायालयासमोर सादर केलेल्या आरोपपत्रात केला आहे. विशेष न्यायालयाने या आरोपपत्राची दखल घेत मनी लाँड्रिंग प्रकरणात पुढील कारवाई करण्यास मान्यता दिली आहे. नवाब मलिक यांच्यावर या प्रकरणात पुढील कारवाई करण्यासाठी पुरेसा आधार असल्याचं निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. आरोपीचा मनी लाँड्रिंग प्रकरणात हात असल्याचं सकृतदर्शनी दिसत असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे.
नवाब मलिकांनी मनी लाँड्रिंग केलं, ईडीच्या दोषारोपपत्रात नोंद
नवाब मलिकांचे डि-गँगशी संबंध होते. नवाब मलिकांनी मनी लाँड्रिंग केल्याचं ईडीने दाखल केलेल्या दोषारोपपत्रात सांगण्यात आलं आहे. नवाब मलिक हे हसीना पारकर, सलीम पटेल, सरदार शहावली खान यांच्या संपर्कात असल्याचीही माहिती आहे. तर डि-गँगशी संबंध ठेवूनच मलिकांनी गोवावाला कंपाऊंडची जागा मिळवली, असं या दोषारोपपत्रात म्हटलं आहे.
या सगळ्या पार्श्वभूमीवर निलेश राणे यांनी नवाब मलीक यांचा राजीनामा आता राष्ट्रवादी घेणार का? असा सवाल उपस्थित करत थेट शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. यावर राष्ट्रवादीकडून कोणती प्रतिक्रिया येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दरम्यान, संभाजी राजे यांच्या उमेदवारी वरूनही निलेश राणे यांनी शरद पवार आणि शिवसेनेच्या संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.
भूमिका बदलली नाही ते पवार साहेब कसले? - निलेश राणे
'हे होणारच होतं, पवार साहेब आणि शब्द पाळला होऊ शकत नाही. भूमिका बदलली नाही ते पवार साहेब कसले?? राजे जर शिवसेने सोबत जाणार तर संज्या दुसऱ्या सीट वर आहे ज्याने मराठा मुक मोर्चाची मुका मोर्चा म्हणून खिल्ली उडवली होती, विसरू नका', असे ट्विट निलेश राणे यांनी केलं आहे.
No comments:
Post a Comment