Agneepath Scheme : 'अग्निपथ' योजनेवरून आंदोलनाचा वणवा पेटला; बिहारमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, ट्रेनची जाळपोळ - latur saptrang

Breaking

Thursday, June 16, 2022

Agneepath Scheme : 'अग्निपथ' योजनेवरून आंदोलनाचा वणवा पेटला; बिहारमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, ट्रेनची जाळपोळ

 

rail



Agneepath Scheme : 'अग्निपथ' योजनेवरून आंदोलनाचा वणवा पेटला; बिहारमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, ट्रेनची जाळपोळ

Protest Against Agneepath Scheme : लष्करी सेवेसाठी केंद्र सरकारने लागू केलेल्या अग्निपथ योजनेला मोठ्या प्रमाणावर विरोध सुरू झाला आहे. बुधवारी बिहारमध्ये या योजनेविरोधातील आंदोलनाची ठिणगी पडली होती. त्यानंतर आज अनेक जिल्ह्यात आंदोलनाचा वणवा पेटला आहे. आज हरयाणातील गुरुग्राममध्येही आंदोलन झाले. आंदोलक विद्यार्थी-युवकांनी गुरुग्राममध्ये दिल्ली-जयपूर महामार्गावर रास्ता रोको केले आहे. तर, बिहारमधील आंदोलनाला हिंसक वळण लागले असून काही ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. 

केंद्र सरकारने अग्निपथ योजना जाहीर केली आहे. या योजनेनुसार भारतीय लष्करात चार वर्षांसाठी भरती केली जाणार आहे. त्यातील 25 टक्के जवानांना लष्करी सेवेत पुढील 15 वर्षासाठी दाखल करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या या योजनेला मोठा विरोध सुरू झाला आहे. 

बिहारमधील छपरा जिल्ह्यात आंदोलक विद्यार्थी-युवकांनी छपरा जंक्शनजवळ एका पॅसेंजर ट्रेनला आग लावल्याची घटना घडली. जहानाबाद आणि नवादामध्ये सैन्य भरतीसाठी तयारी करत असलेले विद्यार्थी रस्त्यावर उतरले. भारतीय लष्करातील कंत्राटी पद्धतीच्या नोकरीविरोधात नवादामधील विद्यार्थ्यांमध्ये मोठा संताप असल्याचे दिसत आहे. नवादामधील प्रजातंत्र चौकात विद्यार्थ्यांनी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करत गदारोळ केला. सहरसामध्ये सैन्य भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी गुरुवारी सकाळी रेले रोको आंदोलन केले. काहींनी राजधानी एक्स्प्रेसच्या कोचवर लाठीने हल्लादेखील केला. त्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

आरा जिल्ह्यातही आंदोलकांनी मोठा गोंधळ घातला. आरा रेल्वे स्थानकात आंदोलकांनी तोडफोड केली. या आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. बेगूसरायमध्येही युवकांनी टायर जाळून केंद्र सरकारच्या या योजनेला विरोध दर्शवला आहे. 

बिहारमधील आंदोलनाच्या वणव्याची धग हरयाणामध्ये ही जाणवू लागली आहे. गुरुग्राममध्ये विद्यार्थ्यांनी दिल्ली-जयपूर महामार्गावर रास्ता रोको केला आहे. पलवलमध्ये ही रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे. 

बुधवारी, बिहारमधील बक्सर, मुझफ्फनगरसह काही ठिकाणी आंदोलन झाले होते. त्यानंतर आजही आंदोलन सुरू राहिले.

राजस्थानमध्येही  युवकांनी या योजनेविरोधात आंदोलन केले होते. बुधवारी दुपारी आंदोलक विद्यार्थ्यांनी जयपूर-दिल्ली राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको केला होता. पोलिसांनी तात्काळ आंदोलकांना महामार्गावरून हटवले. या प्रकरणी 10 आंदोलक युवकांना ताब्यात घेतले. तर,अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

अग्निपथ योजनेला विरोध का?

केंद्र सरकारने जाहीर केलेली योजना चुकीची असल्याचा आक्षेप विद्यार्थ्यांनी घेतला आहे. केंद्र सरकार फक्त चार वर्षांसाठी सैन्यात दाखल करून घेणार, त्यानंतर निवृत्ती स्वीकारण्यास सांगणार आहे. त्यानंतरच्या आयुष्यात काय करणार असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

चार वर्ष सेवा बजावल्यानंतर 25 टक्के अग्निवीरांना लष्करात कायम स्वरुपी नोकरी देण्यात येणार आहे. मात्र, दहावी आणि बारावी उत्तीर्ण झालेल्या अग्नीवीर झालेल्या 75 टक्के युवकांकडे कोणता पर्याय असणार,  असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. चार वर्षाच्या सेवेतून निवृत्त झाल्यानंतर केंद्र सरकारकडून या युवकांना जवळपास 12 लाख रुपयांचा सेवा निधी देणार आहे. मात्र, या युवकांना पर्यायी रोजगार देण्यासाठी कोणती योजना सरकारकडे आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

No comments:

Post a Comment