राजर्षी छत्रपती शाहू महाराज सर्वकालीन आदर्श राजे – उपमुख्यमंत्री अजित पवार - latur saptrang

Breaking

Sunday, June 26, 2022

राजर्षी छत्रपती शाहू महाराज सर्वकालीन आदर्श राजे – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई दि. 26 :- राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा रयतेच्या कल्याणाचा वसा व वारसा समर्थपणे पुढे नेला. उपेक्षित, वंचित घटकांना मानसिक गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी सामाजिक न्यायाचा क्रांतिकारक विचार दिला. सामाजिक न्यायाचे प्रणेते, आरक्षणाच्या संकल्पनेचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे सर्वकालीन आदर्श राजे होते. त्यांचे सामाजिक न्यायाचे विचार मार्गदर्शक असून त्या विचारांवरच राज्याची आजही वाटचाल सुरू आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्यांना आदरांजली वाहिली. उपमुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती आणि सामाजिक न्याय दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणतात की, राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे शेतकऱ्यांचे तारणहार, बहुजनांचे पालनकर्ते होते. आपल्या संस्थानात त्यांनी शेतकरी हिताचे कायदे केले. शेतीसाठी धरणे बांधली. बहुजनांच्या मुलांना शिक्षणाची दारे खुली करुन दिली. त्यांच्यासाठी वसतिगृहे बांधली. उद्योगाला प्रोत्साहन दिले. प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. नोकरीमध्ये आरक्षण दिले. महिलांच्या सक्षमीकरणाचे कायदे केले. सामाजिक सुधारणा करून सर्वांना समान न्याय देण्याचा प्रयत्न केला. बहुजनांना शिक्षण, जातीभेद निर्मूलन, नोकऱ्यांमध्ये आरक्षण, स्त्रीमुक्तीसाठी कायदे करणारे राजर्षी शाहू महाराज हे देशातील थोर समाजसुधारक, लोकराजा होते.  राजर्षी शाहू महाराज यांच्या पुरोगामी, प्रगत, दूरदृष्टीच्या विचारांमुळे त्यांचे विचार आपल्यासाठी नेहमीच मार्गदर्शक, प्रेरणादायी आहेत.

*****



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/C0wrZaP
https://ift.tt/FxKvrAz

No comments:

Post a Comment