खाद्यतेलाच्या नमुन्यांचे होणार सर्वेक्षण - latur saptrang

Breaking

Friday, August 5, 2022

खाद्यतेलाच्या नमुन्यांचे होणार सर्वेक्षण

मुंबई, दि. 4 ; दैनंदिन जीवनात विविध अन्न पदार्थ बनविण्याकरिता खाद्यतेलाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. सर्व जनतेला चांगल्या दर्जाचे खाद्यतेल मिळावे याकरिता अन्न व औषध प्रशासन नेहमी सतर्क असून नियमितपणे तसेच विशेष मोहिमांमधून खाद्यतेलाचे नमुने प्रयोगशाळेमार्फत तपासणीकरिता घेण्यात येतात.

त्याच धर्तीवर अन्न सुरक्षा प्राधिकरण, नवी दिल्ली यांनी दिलेल्या निर्देशानुसार संपूर्ण राज्यात खाद्यतेलाचे व वनस्पतीचे तसेच बहु स्त्रोत खाद्यतेल Multi-Source Edible Oil) च्या अनुषंगाने सर्वेक्षण मोहीम दि. 1 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट 2022 पर्यंत राबविण्यात येत असून या कालावधीत स्थानिक व नामांकित मोठ्या ब्रँड्सच्या खाद्यतेलाचे नमुने सर्वेक्षणासाठी घेऊन विश्लेषण करण्यात येणार आहे. बहु स्त्रोत खाद्यतेलाची विक्री पारवान्याशिवाय करता येत नाही. तथापि ही बाबदेखील तपासण्यात येणार आहे. तसेच सुट्या खाद्यतेल विक्रीस प्रतिबंध असून सुटे खाद्यतेल विक्री करणाऱ्यांवर कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येणार आहे.

या मोहिमेअंतर्गत दि. 04 ऑगस्ट 2022 रोजी पुणे विभागात खाद्यतेलाचे एकूण 16 सर्वेक्षण नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. या सर्वेक्षण नमुन्यांचे विश्लेषण अहवाल प्राप्त होताच कमी दर्जाचे खाद्यतेल विक्रेत्यांकडून नियमित अन्न नमुने घेऊन कायद्याअंतर्गत पुढील कारवाई घेण्यात येणार आहे, अशी माहिती विभागाकडून देण्यात आली आहे.

००००

अर्चना शंभरकर/विसअ/अन्न व औषध प्रशासन



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/V9g7aHL
https://ift.tt/V7wWkm3

No comments:

Post a Comment