महाराष्ट्र ग्रामीण बँकेवर दरोडा - latur saptrang

Breaking

Tuesday, September 6, 2022

महाराष्ट्र ग्रामीण बँकेवर दरोडा



लातूर: जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ या तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेवर सोमवारी मध्यरात्री चोरट्यांनी दरोडा टाकून २७ लाख रुपयांची रोकड पळवल्याची घटना घडली. पोलिसांनी पंचनामा केला असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

शिरूर अनंतपाळ येथील नगरपंचायतीच्या इमारतीमध्ये महाराष्ट्र बँकेची इमारत आहे. या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था असून बँकेत मजबूत पाच लॉकर्स आहेत. मात्र तरीही दरोडेखोरांनी नियोजनबध्दपणे मोठ्या शिताफीने बँकेवर दरोडा टाकला आणि २७ लाखाची रोकड लंपास केली. सकाळी ही बाब बँक कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर एकच गोंधळ उडाला. बँकेत चोरी झाल्याची माहिती शाखेचे व्यवस्थापक खैरे सौरभ वाल्मीक यांनी पोलिसांना दिली.

या प्रकरणी चाकूर विभागाचे पोलीस उप अधीक्षक अनिकेत कदम यांनी घटनास्थळी भेट देत सर्व गोष्टीची पाहणी केली. या प्रकरणाचा पंचनामा पूर्ण करून गुन्हा नोंदवण्यात येणार आहे. आरोपींचा ताबडतोब छडा आरोपींना पकडण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असे कदम यांनी सांगितले.

दरम्यान बँकेवरील दरोड्याची माहिती शिरूर अनंतपाळ तालुक्यात वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे या घटनेने नागरिकांमध्ये आणि बँकेच्या ठेवीदारांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ग्राहकांच्या ठेवीवर परिणाम होणार नाही

दरोड्याच्या या घटनेचा बँकेच्या ग्राहकांच्या ठेवीवर कुठलाही परिणाम होणार नाही. त्यामुळे ग्राहकांनी काळजी करू नये. बँकेच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे असे आवाहन महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे सहाय्यक व्यवस्थापक अविनाश कामतकर यांनी ग्राहकांना केले आहे.

No comments:

Post a Comment