छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून सोळागाव पाणी पुरवठा योजनेचे काम सुरु....
लासलगाव विंचूरसह सोळागाव पाणी पुरवठा योजनेसाठी जलजीवन मिशन मधील रेट्रोफिटिंग योजनेतून मंजूर झालेल्या १७ कोटी १५ लक्षच्या नुतनीकरण कामांना कार्यारंभ आदेश - छगन भुजबळ
नाशिक,दि.१८ ऑक्टोबर :- निफाड तालुक्यातील लासलगाव विंचूरसह सोळागावांना वरदान ठरलेल्या सोळागाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेस जलजीवन मिशन अंतर्गत नूतनपाईप लाईन, पंपिंग मशिनरी व इतर कामांसाठी रेट्रोफिटिंग योजनेतून नुकतीच प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली होती. या योजनेसाठी १७ कोटी १५ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून या योजनेच्या दुरुस्तीच्या कामांना कार्यारंभ आदेश प्राप्त झाला असून योजनेचे काम सुरु झाले असल्याची माहिती राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.
माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून निफाड तालुक्यातील लासलगाव विंचूरसह सोळा गावांसाठी सोळागाव प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना सुरु आहे. सदर पाणी पुरवठा योजना सन २०१० पासून कार्यान्वित करण्यात येऊन सदर योजना सन २०१२ साली संयुक्त पाणी पुरवठा समितीकडे देखभालदुरुस्ती व योजना चालविण्यासाठी हस्तांतरित करण्यात आलेली होती. सदर प्रादेशिक पाणी पुरवठा योजना या सोळा गावांसाठी अतिशय उपयुक्त योजना ठरली आहे. सदर योजनेची पाईप लाईन जुनी झाल्याने अनेक ठिकाणी लिकेजचा सामना करावा लागत असल्याने योजना चालविणे अतिशय कठीण बनले होते. यासाठी छगन भुजबळ यांच्या प्रयत्नातून नुकतीच सदर योजनेच्या नुतनीकरणास मंजुरी मिळाली होती. त्यानंतर या योजनेच्या कामास कार्यारंभ आदेश देण्यात आला असून योजनेचे कामास सुरुवात झाली आहे.
लासलगाव, विंचूरसह सोळागाव प्रादेशिक पाणी पुरवठा मूळ योजना सन २०३१ पर्यंत एकूण संकल्पित ९९ हजार ९०१ लोकसंख्येकरिता मंजूर करण्यात आलेली आहे. या योजनेच्या मुख्य दाबनलिकेसाठी ४५७ मी.मी व्यासाचे एम.एस.पाईप वारण्यात आले आहेत. एकूण लांबीपैकी साधारण ५५०० मी. पाईपलाईन जमिनी खालून टाकलेली असल्याने ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर नियमित लिकेज होते. त्यामुळे योजनेचा पाणी पुरवठा वारंवार खंडित होत होता. जलजीवन मिशन कार्यक्रमामधील रेट्रोफिटिंग अंतर्गत पूरक पाणी पुरवठा योजना तयार करण्यात येऊन अंदाजपत्रके व आराखडयास मंजुरी मिळाली होती. नवीन डीएसआर प्रमाणे प्रशाकीय मान्यता आणि निविदा प्रक्रियेत अधिक वेळ गेल्याने या योजनेस पाणी पुरवठा करण्यात अनेक अडचणी सुरु होत्या. याबाबत छगन भुजबळ यांनी जिल्हास्तरावरून निधी प्राप्त करून तात्पुरत्या स्वरूपात दुरुस्ती करण्यात येऊन खंडित झालेला पाणी पुरवठा सुरळीत केला होता. त्यानंतर त्यांच्या सततच्या पाठपुराव्यातून योजनेस कार्यारंभ आदेश प्राप्त झाला असून योजनेच्या कामास सुरुवात झाली आहे.
विशेष म्हणजे ही प्रादेशिक पाणी पुरवठा योजना यशस्वीरित्या सुरु राहिण्यासाठी या योजनेमध्ये सौर ऊर्जा प्रकल्पाची तरतूद यात करण्यात आली असल्याने विजेचा प्रश्न कायमचा निकाली निघाला आहे. यामुळे खर्चामध्ये बचत होणार आहे. या योजनेमध्ये लासलगाव, विंचूर, विठ्ठलवाडी, सुभाषनगर, विष्णूनगर, डोंगरगाव, नांदगाव, कोटमगाव, टाकळी विंचूर, बोकडदरा, धारणगाव खडक, धारणगाव विर, ब्राम्हणगाव विंचूर, पिंपळगाव नजिक, निमगाव वाकडा, हनुमाननगर या सोळा गावांचा समावेश असून योजनेच्या नुतनीकरणामुळे येथील गावांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
No comments:
Post a Comment